महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जळगावात भव्य रोड शो..

जळगाव – शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज, दुपारी शहरात भव्य ‘महाविजय रथयात्रा’ काढण्यात आली. शिवाजी पुतळ्यापासून सुरू झालेल्या या रथयात्रेला शहरातील विविध चौका–चौकांत नागरिकांनी उस्फूर्त गर्दी करत जल्लोषात स्वागत केले.
या महाविजय रथयात्रेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजू मामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रोड शोदरम्यान महायुतीचे ७५ उमेदवार रथयात्रेत सहभागी झाले असून, विविध घोषणांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
घोषणाबाजी आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांची ही महाविजय रथयात्रा शिवाजी पुतळ्यापासून नेहरू चौक, लालबहादूर शास्त्री टॉवर, चित्रा चौक, गोलाणी मार्केट मार्गे पुन्हा शिवाजी पुतळा येथे जल्लोषात समारोप करण्यात आला. रथयात्रेदरम्यान परिसरात प्रचंड गर्दीचे स्वरूप पाहायला मिळाले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जळगाव पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.