राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला : 15 जानेवारीला मतदान..

जळगाव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून राज्य निवडणूक आयोगाने आज २९ महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जळगाव महापालिकेसह राज्यातील सर्व संबंधित महापालिकांसाठी बुधवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर गुरुवार, दि. १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यांनी आज मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन बहुप्रतिक्षित महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा केली. यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रशासकांच्या माध्यमातून सुरू असलेल्या महापालिकांच्या कारभारावर लवकरच लोकप्रतिनिधींची निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार दि. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांची धावपळ आता वेग घेणार आहे.पत्रकार परिषदेत बोलताना राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात येत आहे. राज्यातील सर्व सार्वत्रिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली असून, यामध्ये एकूण २९ महापालिकांचा समावेश आहे.
दरम्यान, जळगाव महापालिका निवडणुकीच्या घोषणेमुळे शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, इच्छुक उमेदवारांकडून तयारीला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत उमेदवारी अर्ज, आघाड्या, युती आणि प्रचाराच्या रणधुमाळीत जळगाव शहर रंगणार असल्याचे चित्र आहे.