सफाई कामगाराकडून २ हजारांची लाच घेतांना कुटीर रुग्णालयाचा सहायक अधीक्षक ACB च्या जाळ्यात..

पारोळा (प्रतिनिधी) – कुटीर रुग्णालय पारोळा येथे कार्यरत असलेले सहायक अधीक्षक विजय प्रकाश वाघ यांना सफाई कामगाराकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी जळगावच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे कुटीर रुग्णालय पारोळा, जि. जळगाव येथे अनुकंपा तत्वावर सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांना नोकरीचे स्थायी आदेश मिळवून देण्यासाठी त्यांनी दि. १३ एप्रिल २०२६ रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता.यानंतर दि. २४ एप्रिल २०२६ रोजी तक्रारदारांनी सहायक अधीक्षक विजय प्रकाश वाघ यांची भेट घेऊन स्थायी आदेशाबाबत विचारणा केली असता, वाघ यांनी ३ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी त्यावेळी पैसे नसल्याचे सांगून तेथून निघून गेले. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. २८ एप्रिल २०२६ रोजी अँटी करप्शन ब्युरो, जळगाव येथे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने कुटीर रुग्णालय पारोळा येथे सापळा रचला. यावेळी ३ हजार रुपयांच्या मागणी करून तडजोडीअंती २ हजार रुपये स्वीकारताना विजय वाघ यांना रंगेहात पकडण्यात आले.कारवाईदरम्यान अंगझडती घेतली असता त्याच्याकडे रोख ३३० रुपये आणि एक Vivo कंपनीचा मोबाईल फोन असा मुद्देमाल आढळून आला.या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला
सदर कारवाई
जळगाव एसीबी चे पोलिस उपअधिक्षक योगेश ठाकुर, हेमंत नागरे, पोलिस निरीक्षक, सुरेश पाटील, पाहेकॉ सुनिल वानखेडे,पोहेकों/बाळु मराठे,यांनी केली.