जळगाव पोलिसांची गोवंश तस्करीवर मोठी कारवाई : 463 किलो मांस जप्त..

जळगाव : जिल्ह्यात गोवंश तस्करीविरोधात जळगाव पोलीस दलाने आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई करत मोठे यश मिळवले आहे. २६ एप्रिल ते २ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत एकूण ६९.३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईदरम्यान तस्करीसाठी वापरण्यात येणारी २४ वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांची एकूण किंमत सुमारे ४६.१० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय पोलिसांनी ७८ मुक्या जनावरांची सुटका केली असून यामध्ये गायी, बैल, म्हशी तसेच गोवंशाचा समावेश आहे. या कारवाईमुळे अनेक जनावरांचे प्राण वाचले असून पोलिसांच्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.तसेच या कारवाईत ४६३ किलो अवैध मांस जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत १५.२२ लाख रुपये आहे. संबंधित प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
गोवंश तस्करी रोखण्यासाठी जळगाव पोलिसांनी सुरू केलेल्या या विशेष मोहिमेमुळे तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.