जळगाव

“ऑपरेशन स्क्रॅप” जळगाव पोलिसांची भंगार बाजारावर एकाचवेळी कारवाई..

जळगाव (प्रतिनिधी) –जिल्ह्यात वाढत्या चोरी आणि घरफोडीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी ‘ऑपरेशन स्क्रॅप’ अंतर्गत मोठी मोहीम हाती घेतली आहे. सायंकाळपासून सुरू झालेल्या या विशेष कारवाईत जिल्ह्यातील प्रमुख भंगार दुकानांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले, ज्यामुळे भंगार व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या तपासात असे स्पष्ट झाले आहे की, चोरीचा माल थेट भंगार दुकानांमार्फत बाजारात खपवला जातो. याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही समन्वित कारवाई राबवण्यात येत आहे.

या मोहिमेत पोलिसांनी विशेषतः वाहनांचे सुटे भाग, कागदपत्रांशिवाय असलेली वाहने, शेती उपकरणे, तसेच रेल्वे व वीज साहित्य यावर लक्ष केंद्रित केले आहे. अनेक प्रकरणांमध्ये चोरीनंतर मालाचे तुकडे करून भंगारात विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे.

नोंदी नसतील तर थेट गुन्हा :भंगार दुकानदारांनी खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूची नोंद ठेवणे कायदेशीर बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संशयास्पद माल किंवा अपूर्ण नोंदी आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

गुन्हेगारी साखळी तोडण्याचा प्रयत्न : या कारवाईमुळे चोरीच्या साखळीतील महत्त्वाचा दुवा तुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे