भुसावळ

भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे अपात्र :  शासनाचा मोठा निर्णय..

भुसावळ – नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी मोठी घडामोड समोर आली आहे. भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांना राज्य शासनाने नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोन्ही पदांवरून अपात्र ठरवले आहे. जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवार, ४ मे २०२६ रोजी शासनाने अधिकृत आदेश जारी केला. या निर्णयामुळे सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसला आहे.

भुसावळ नगरपालिकेतील नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गायत्री गौर-भंगाळे यांनी विजय मिळवला होता. मात्र, त्यांच्या जातप्रमाणपत्रावर प्रतिस्पर्धी गटाकडून आक्षेप घेण्यात आला. भंगाळे या मूळ महाराष्ट्रातील नसून मध्य प्रदेशातील असल्याचा दावा पुराव्यांसह करण्यात आला होता. या तक्रारीची चौकशी जात पडताळणी समितीने केली असता आरोपांमध्ये तथ्य आढळून आले आणि त्यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे सादर केला होता. या अहवालावर विचार करून सहसचिव विद्या हम्पय्या यांनी ४ मे रोजी अपात्रतेचा आदेश काढला. विशेष म्हणजे, शासनाने २३ एप्रिल २०२६ पासूनच त्यांचे नगरसेवक पद रद्द ठरवले आहे. त्यामुळे त्यांची निवडणूक पूर्णतः अवैध ठरली आहे.

नगराध्यक्षा अपात्र ठरल्याने भुसावळच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भंगाळे गट न्यायालयात जाण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे शहरात नव्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. आता पालिकेची सत्ता कोणाच्या हाती जाणार आणि आगामी राजकीय समीकरणे कशी बदलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे