जिल्ह्यात रात्रीची गस्त होणार अधिक ‘प्रोफेशनल’ : घरफोडी आणि वाहन चोरी रोखण्यासाठी पोलिसांचा नवा अॅक्शन प्लॅन..

जळगाव – जिल्ह्यात वाढत्या घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता रात्र गस्तीची पद्धत पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपरिक गस्त, पोलीस स्टेशन भेटी किंवा लॉकअप तपासणीपुरते मर्यादित न राहता आता प्रत्यक्ष फिल्डवर परिणामकारक आणि “Result Oriented” कारवाईवर भर दिला जाणार आहे.
गुन्हेगारांवर थेट वचक निर्माण करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने रात्र गस्तीमध्ये अनेक महत्त्वाचे बदल लागू केले असून, ही मोहीम अधिक शिस्तबद्ध, तांत्रिक आणि लक्ष्याधारित असणार आहे.
टार्गेट-बेस्ड कोम्बिंग ऑपरेशनवर भर
आता रात्र गस्त म्हणजे केवळ फेरफटका नसून संवेदनशील भागांमध्ये विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवले जाणार आहे. गुन्हेगारीच्या दृष्टीने धोकादायक आणि संशयित हालचाली आढळणाऱ्या परिसरांमध्ये पोलिसांचे संयुक्त पथक अचानक धाड टाकणार आहे. अंधारे भाग, उद्याने, मोकळी मैदाने आणि ओसाड जागांची विशेष तपासणी केली जाणार आहे.
अचानक नाकाबंदीने गुन्हेगारांची कोंडी
जिल्ह्यातील प्रमुख प्रवेशद्वार, महामार्ग आणि टोल नाक्यांवर आता निश्चित वेळेऐवजी अचानक नाकाबंदी केली जाणार आहे. वेळ आणि ठिकाण सातत्याने बदलल्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांच्या हालचालींचा अंदाज बांधणे कठीण होणार आहे.
हिस्ट्रीशीटर्स आणि संशयितांवर विशेष नजर
जेलमधून सुटलेले आरोपी, जामिनावर असलेले गुन्हेगार आणि फरार संशयितांची अद्ययावत यादी रात्र गस्त पथकाकडे उपलब्ध राहणार आहे. त्यांच्या वास्तव्याची आणि हालचालींची प्रत्यक्ष पडताळणी रात्रीच्या वेळी केली जाणार आहे. तसेच अलीकडील घरफोडीच्या घटनांचा आणि गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीचा (Modus Operandi) अभ्यास करून त्यानुसार कारवाई केली जाणार आहे.
सायरन आणि अंबर लाईटचा वापर
निवासी भाग, MIDC परिसर आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये पोलिसांच्या गाड्यांचे सायरन आणि अंबर लाईटचा वापर वाढवण्यात येणार आहे. गस्तीची वेळ आणि मार्ग सतत बदलत राहणार असल्याने गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सोसायट्या आणि सुरक्षा रक्षकांशी संवाद
पोलीस आता फक्त रस्त्यांवर गस्त न घालता सोसायट्यांतील वॉचमन, सुरक्षा रक्षक आणि नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. बंद घरे, उघडी गेट्स किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ नागरिकांना सतर्क केले जाणार आहे.
CCTV आणि ATM सुरक्षेवर विशेष लक्ष
महत्त्वाच्या चौकांतील आणि व्यापारी भागांतील CCTV कॅमेरे सुरू स्थितीत आहेत का, याची तपासणी गस्त पथकाकडून केली जाणार आहे. तसेच ATM केंद्रांना वारंवार भेट देऊन सुरक्षा व्यवस्था तपासली जाणार आहे. MIDC आणि कारखाना परिसरांमध्ये विशेष पेट्रोलिंग वाढवले जाणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे थेट नियंत्रण
या संपूर्ण मोहिमेचे पर्यवेक्षण “जिल्हा रात्र गस्त अधिकारी” आणि विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून केले जाणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट नियंत्रणामुळे रात्र गस्त अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि उत्तरदायी होणार असल्याचा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
पोलीस प्रशासनाच्या या नव्या धोरणामुळे घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.