M J कॉलेज परिसरातील ३ सायबर कॅफेंवर पोलिसांचा छापा; कॅफे चालक आणि मालकांविरुद्ध गुन्हे दाखल..

जळगाव – M J कॉलेज परिसरात किशोरवयीन मुलामुलींना जागा उपलब्ध करून देत अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन दिल्याच्या आरोपावरून रामानंद नगर पोलीस आणि दामिनी पथकाने संयुक्त कारवाई करत तीन अवैध सायबर कॅफेंवर छापेमारी केली. या कारवाईत संबंधित कॅफे चालक व मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. ९ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती की, रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील एम.जे. कॉलेज परिसरातील काही कॅफेमध्ये तरुण मुलामुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात आहे.
या माहितीच्या आधारे रामानंद नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच जळगाव पोलीस दलाच्या दामिनी पथकाने संयुक्त कारवाई करत ब्लिस कॅफे, इनफिनिटी कॅफे आणि लव्ह बॉक्स कॅफे येथे अचानक छापा टाकला. कारवाईदरम्यान काही तरुण मुलं व मुली अश्लील चाळे करताना आढळून आले. संबंधित तरुणांना समज देऊन सोडून देण्यात आले.
दरम्यान, कॅफे चालक आणि मालकांविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १४७/२०२६, १४८/२०२६ आणि १४९/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९ व १३१ (अ-३) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोहवा जितेंद्र राजपूत व पोहवा जितेंद्र राठोड हे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.