जळगाव

भवरखेड मध्ये भेसळयुक्त दूध निर्मिती केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाची धाड..

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या तावडीतून मुख्य सूत्रधार पसार..  

जळगाव, दि. २८ : भवरखेड ता. धरणगाव येथे बनावट दूध निर्मिती करणाऱ्या व्यक्तीवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले. मात्र कारवाईदरम्यान आरोपी अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देत घटनास्थळावरून पसार झाल्याची घटना घडली आहे.

अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार २७ मे २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी सोमनाथ आनंदा माळी (वय ३०) हा खाद्य तेलाचा वापर करून बनावट दूध तयार करताना रंगेहात पकडण्यात आला. तपासणीदरम्यान रिफाइन्ड पामोलीन तेलाचा वापर दुधातील फॅट वाढवण्यासाठी करण्यात येत असल्याचे उघड झाले. पथकाने दोन गाईच्या दुधाचे तसेच खाद्यतेलाचा एक नमुना तपासणीसाठी जप्त केला. तसेच उर्वरित अंदाजे २६६ लिटर भेसळयुक्त दूध पंच, पोलीस पाटील रेखा नंदकिशोर पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आले.

दरम्यान, कारवाई सुरू असताना आरोपी सोमनाथ माळी याने लघुशंकेसाठी जात असल्याचे सांगून अधिकाऱ्यांची दिशाभूल केली आणि घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०७/२०२६ अन्वये २८ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, संबंधित आरोपीविरोधात यापूर्वीही दुधात भेसळ प्रकरणी कारवाई झाली होती. २९ जुलै २०२५ रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित व्यक्ती वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, परिसरात कुठेही बनावट दूध किंवा अन्न भेसळीचे प्रकार आढळल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे