जळगाव जिल्हा

निमगव्हाण येथे अवैध वाळू साठ्यावर पोलिसांची धडक कारवाई : मोठ्या प्रमाणात वाळू साठा जप्त..

जळगाव – जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि साठेबाजीविरोधात जळगाव पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे तब्बल १७०० ब्रास बेकायदेशीर वाळूचा साठा जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनाने अवैध वाळू व्यवसायाविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे निमगव्हाण येथील दादाजी धुनीवाले मंदिर परिसरात तापी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून मोठ्या प्रमाणावर साठवणूक करण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. आगामी काळात ही वाळू चढ्या दराने विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.या माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस पथक तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे घटनास्थळी धडक दिली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे संबंधितांमध्ये एकच खळबळ उडाली.

पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता वाळूचे मोठमोठे ढिगारे आढळून आले. प्राथमिक अंदाजानुसार हा साठा सुमारे १७०० ब्रास इतका असल्याचे समोर आले असून, त्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. सध्या घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरू असून, संपूर्ण साठा जप्त करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.

दरम्यान, या अवैध साठ्यामागे नेमके कोणते वाळू माफिया कार्यरत आहेत, उत्खनन किती दिवसांपासून सुरू होते आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस व महसूल विभागाकडून संयुक्तरीत्या केला जात आहे. जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करीविरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात असून, प्रशासनाच्या या धडक भूमिकेमुळे वाळू चोरी आणि बेकायदेशीर वाहतुकीला मोठा आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे