यावल

मध्यरात्री एका फोनवर धावले आमदार अमोल जावळे; गिरीश महाजनांच्या हस्तक्षेपाने मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात..

टाकरखेडा येथील कुटुंबाला मुंबईतील रुग्णालयात अडचण; रात्रीपासून सकाळपर्यंत लोकप्रतिनिधींचे प्रयत्न

यावल (प्रतिनिधी) : मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नागरिकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा आमदार अमोल जावळे यांच्या कृतीतून दिसून आले. टाकरखेडा येथील एका कुटुंबाला मुंबईतील रुग्णालयातून मृतदेह घरी आणण्यासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असताना, रात्री उशिरा संपर्क साधल्यानंतर आमदार अमोल जावळे यांनी तत्काळ मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्तक्षेपानंतर अखेर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

टाकरखेडा येथील रहिवासी संजय मुरलीधर पाटील (वय ५३) यांचे २६ नोव्हेंबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने मुंबईतील ग्लेनीगल्स रुग्णालयात निधन झाले. संजय पाटील यांच्यावर याच रुग्णालयात यापूर्वी लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. टाटा ट्रस्टच्या मदतीने तसेच कुटुंबीयांनी स्वखर्चातून आतापर्यंत सुमारे २५ ते २७ लाख रुपये उपचारासाठी खर्च केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. निधनानंतर रुग्णालय प्रशासनाकडून उर्वरित बिलापोटी ४ लाख ९९ हजार ६४५ रुपये भरल्याशिवाय मृतदेह सोपविण्यात अडचण असल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. त्यामुळे आधीच दुःखात असलेल्या पाटील कुटुंबीयांसमोर मृतदेह गावी आणण्याचा प्रश्न निर्माण झाला.

या अडचणीच्या परिस्थितीत नातेवाईकांनी रात्री १० वाजता आमदार अमोल जावळे यांच्याशी संपर्क साधला. संपूर्ण परिस्थिती समजून घेतल्यानंतर त्यांनी मदतीचे आश्वासन देत आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी आणि यंत्रणांशी रात्री १० ते पहाटे १.३० वाजेपर्यंत संपर्क साधून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात मिळावा यासाठी प्रयत्न केले. पहाटे ५ वाजताही त्यांनी पुन्हा फोन करून परिस्थितीची माहिती घेतली.

त्यानंतर सकाळी आमदार अमोल जावळे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून दिले. गिरीश महाजन यांनीही तत्काळ रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधत हस्तक्षेप केला. त्यांच्या प्रयत्नांनंतर २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर पाटील कुटुंबीय मृतदेह घेऊन टाकरखेडाकडे रवाना झाले. दुःखाच्या प्रसंगी एका फोनवर मदतीसाठी पुढाकार घेणारे आमदार अमोल जावळे आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी हस्तक्षेप करणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेची यावेळी कुटुंबीयांकडून व नागरिकांकडून प्रशंसा करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे