गांधी तीर्थ, जळगाव येथे विशेष ऑनलाईन कार्यक्रम; लाभार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..
विकसित भारत रोजगार योजना' अंतर्गत २,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित

जळगाव, दि. 20( प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत देशभरातील लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे २,४०० कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याहस्ते वितरित करण्यात आले. दिल्ली येथील विज्ञान भवनातून झालेल्या या राष्ट्रीय कार्यक्रमाचे देशभरातील २०० ठिकाणी थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून जळगाव येथील गांधी तीर्थच्या कस्तुरबा सभागृहात विशेष ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन नाशिक विभागीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त-१ अतुल कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या कार्यक्रमास जळगावच्या खासदार स्मिता वाघ, आमदार राजू मामा भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, भविष्य निर्वाह निधी आयुक्त-२ मनोज कोळी, भविष्य निर्वाह निधी सहाय्यकआयुक्त मोहित दीक्षित, जळगाव पीएफ कार्यालयाचे दीपक चौधरी तसेच जिल्ह्यातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी, नियुक्ते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि श्रम व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनीही दिल्ली येथून उपस्थिती लावली.
यावेळी देशभरातील २०० हून अधिक केंद्रांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत रोजगार योजनेचे महत्त्व स्पष्ट केले. ही योजना केवळ रोजगार उपलब्ध करून देणारी नसून, पहिल्या नोकरीत प्रवेश करणाऱ्या युवकांच्या आकांक्षांना बळ देणारी आणि उद्योगक्षेत्र व कार्यबल यांच्यात मजबूत दुवा निर्माण करणारी महत्त्वपूर्ण योजना असल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांनाही एकाच वेळी प्रोत्साहन देणारी ही योजना असून, रोजगारनिर्मितीला राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
योजनेच्या यशाची माहिती देताना पंतप्रधानांनी सांगितले की, आतापर्यंत देशात सुमारे ७० लाख नवीन रोजगार निर्माण झाले असून, तितक्याच प्रथमच नोकरी मिळालेल्या युवकांना सामाजिक सुरक्षा व्यवस्थेच्या कक्षेत आणण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे २० लाख युवकांनी पहिल्या नोकरीतील सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला असून, जवळपास १० लाख लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान वितरित करण्यात आले आहे. आतापर्यंत २,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून, हे केवळ आर्थिक सहाय्य नसून देशाने युवकांच्या परिश्रमाचा केलेला सन्मान आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यात व्यक्त केलेला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक असून विकसित भारताच्या उभारणीत युवा शक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या बारा वर्षांत पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्र, डिजिटल अर्थव्यवस्था, नवोपक्रम, अवकाश तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्ससह विविध क्षेत्रांमध्ये रोजगारनिर्मितीला चालना देण्यात आली आहे. ‘मेक इन इंडिया’, ‘व्होकल फॉर लोकल’, स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आणि ‘मिशन मॅन्युफॅक्चरिंग’ यांसारख्या उपक्रमांमुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
जळगाव येथील कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. लाभार्थी कर्मचारी पूजा धनगर आणि नियोक्ते प्रमोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी उद्योग क्षेत्राच्या वतीने भावना व्यक्त केल्या. खासदार स्मिता वाघ यांनी विकसित भारत रोजगार योजनेमागील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोन स्पष्ट केला, तर आमदार राजू मामा भोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. भविष्य निर्वाह निधी आयुक्त-२ मनोज कोळी यांनी भविष्य निर्वाह निधी योजनेची सविस्तर माहिती दिली.
यावेळी विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत विविध संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैन इरिगेशनचे ज्ञानेश्वर शेंडे आणि नितीन चोपडा यांनी केले.