जळगाव

भंगाळे गोल्डसह ईतर नियमबाह्य जाहिरात फलकांवर मनपाची कारवाई : अतिक्रमण विभागाकडून बोर्ड हटवले..

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील दुभाजकांवर  नियमांचे उल्लंघन करून लावण्यात आलेले भंगाळे गोल्ड जाहिरात फलक अखेर मनपा अतिक्रमण विभागाने हटवले आहेत. सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी केलेल्या लेखी तक्रारीनंतर आणि उपायुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

महानगरपालिकेने शहरातील विविध दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यासाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था (NGO) तसेच उद्योजकांसोबत करार केले होते. या करारामध्ये जाहिरात फलकांसाठी स्पष्ट नियम व अटी घालण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक जाहिरात फलकामध्ये किमान १० मीटरचे अंतर ठेवणे, फलकावरील ४० टक्के जागा महानगरपालिकेच्या जनजागृती अथवा सार्वजनिक हिताच्या जाहिरातींसाठी राखीव ठेवणे आणि उर्वरित ६० टक्के जागा संबंधित संस्थेच्या किंवा व्यावसायिक जाहिरातींसाठी वापरणे बंधनकारक होते. तसेच सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जाहिरात फलक उभारण्यापूर्वी महानगरपालिकेची ‘ना हरकत’ (NOC) घेणेही अनिवार्य करण्यात आले होते.

मात्र संबंधितांनी या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून १० मीटर अंतराचा नियम मोडला आणि जाहिरात फलकांवर १०० टक्के स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात प्रदर्शित केल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची दखल घेत उपायुक्तांनी २४ जुलै २०२६ रोजी संबंधितांना दोन दिवसांच्या आत हे फलक स्वतःहून हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र मुदत संपूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने संबंधित जाहिरात फलक हटविण्याची कारवाई केली.दरम्यान, जळगाव शहरात अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर आणि होर्डिंग्जचे वाढते अतिक्रमण हा गंभीर प्रश्न बनला असून, डिव्हायडर सुशोभीकरणाच्या नावाखाली अनेक ठिकाणी नियमबाह्य जाहिराती लावण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहराचे सौंदर्यही बाधित होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त आयुक्तांच्या निर्देशानुसार झालेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून, शहरातील सर्व अनधिकृत जाहिरात फलकांवर अशाच प्रकारे सातत्याने कारवाई करण्याची मागणीही पुढे येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे