‘पाळधी-तरसोद’ बायपास महामार्ग पहिल्याच पावसात खचला..

जळगाव : पाळधी-तरसोद बायपास राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर पहिल्याच मुसळधार पावसानंतर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मध्य रेल्वे उड्डाणपुलाजवळ महामार्ग मोठ्या प्रमाणात खचल्याने या कामाचा दर्जा, गुणवत्ता नियंत्रण आणि देखरेख यावर संशय व्यक्त केला जात आहे.पहिल्याच मोठ्या पावसात रस्ता खचल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही महामार्ग एका पावसाचाही ताण सहन करू शकत नसेल, तर या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले का? गुणवत्ता तपासणी केवळ कागदोपत्रीच झाली का? अशा प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करून वाहने पर्यायी मार्गाने वळवली. मात्र, या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणात संबंधित कंत्राटदार, कामाची देखरेख करणारे अभियंते आणि गुणवत्ता नियंत्रण करणाऱ्या यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे. या कामाची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून रस्ता खचण्यामागील नेमके कारण जाहीर करण्यात यावे, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.