जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासून उतरल्या रस्त्यावर : सलग ६ तास पूरग्रस्त भागांची पाहणी..

जळगाव – शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी पहाटेपासूनच शहरातील विविध बाधित भागांची तब्बल सहा तास प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश दिले.

महापौरांनी स्टेडियम कॉम्प्लेक्स, घाणेकर चौक, तुकाराम वाडी, पांडे चौक, राधाकृष्ण मंगल कार्यालय परिसर तसेच अजिंठा चौक येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना तातडीने पाणी निचऱ्याच्या कामांना गती देण्याचे आदेश दिले.अजिंठा चौक परिसरात नाल्यांवरील अडथळ्यांमुळे पाण्याचा मोठा वेढा निर्माण झाला होता. या ठिकाणी नाल्यांवरील काही दुकानांचे ढापे हटवून गाळ आणि चेंबरची स्वच्छता करण्यात आली. महापौरांनी स्वतः रस्त्यावर उभे राहून कामाचा आढावा घेत पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यावर भर दिला.महात्मा गांधी मार्केटच्या तळमजल्यावरील काही दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावेळी महापौरांनी अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावून दुकानांतील साचलेले पाणी तातडीने बाहेर काढण्याचे निर्देश दिले. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
पांडे चौकातील रामदेव बाबा मंदिर परिसरात सिंधी कॉलनीकडून आलेले पाणी तुकाराम वाडीतील घरांमध्ये शिरत असल्याचे लक्षात येताच महापौरांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी कलव्हर्ट तोडून नाल्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. तातडीच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत महापौरांचे आभार मानले.
कचरा टाकणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश
गांधी मार्केट परिसरात काही भाजीपाला विक्रेते रस्त्यावर कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापौर दीपमाला काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आरोग्य विभागाला अशा विक्रेत्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देत, यापुढेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. या पाहणी दौऱ्यात महापालिका आयुक्त आदित्य जीवने, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त पंकज गोसावी, शहर अभियंता योगेश बोरोले, आरोग्य विभाग प्रमुख समीर बोरोले, अभियंता योगेश वाणी, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर यांच्यासह मनपाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.