रिक्षेत बसवून महिलेचे मंगळसूत्र हिसकावणारे तिघे ताब्यात :१.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त; एलसीबीची कारवाई…

भुसावळ : बाजार करून पायी घरी जाणाऱ्या महिलेला रिक्षेत बसवून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता महिला बाजार करून घरी जात होत्या. दगडी पुलाजवळील म्हसोबा मंदिर परिसरात एक रिक्षा त्यांच्याजवळ थांबली. रिक्षाचालकाने घरी सोडण्याचे सांगितल्याने महिला रिक्षात बसल्या. त्यानंतर रिक्षातील दोन व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सुमारे २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून नेली.या घटनेप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २००/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. मिळालेल्या माहितीवरून नशिराबाद परिसरातील मुकेरिया हॉटेलजवळ तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये वसीम शेरअली तेली (३८, फातेमा नगर, एमआयडीसी, जळगाव), अरबाज खान अय्युब खान (२६, शिवाजीनगर चौक, जळगाव) आणि वसीम अजमल खान (३६, साती मजार, नशिराबाद) यांचा समावेश आहे.पोलिसांनी आरोपींकडून २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १ लाख रुपये किमतीची एमएच-१९-४-६५६३ क्रमांकाची रिक्षा जप्त केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी वसीम शेरअली तेली आणि वसीम अजमल खान यांच्याविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.