जळगावात आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचा दिमाखात शुभारंभ..
पद्मश्री उस्ताद शाहीद परवेज खान यांच्या सतारवादनाने रसिक मंत्रमुग्ध; ३१० विद्यार्थी सहभागी

जळगाव : स्पीक मेके आणि केसीई सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्रातर्फे आयोजित चारदिवसीय आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचा शुभारंभ १ ऑक्टोबर रोजी मू. जे. महाविद्यालयातील महाकवी कालिदास सभागृहात दिमाखात झाला. प्रसिद्ध सतारवादक पद्मश्री उस्ताद शाहीद परवेज खान यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनानंतर उस्ताद शाहीद परवेज खान यांनी बालकलाकारांसह सतारवादनाचे सादरीकरण केले. त्यांच्या सुरेल सतारवादनाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी कान्ह ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सप्तकलांचे बहारदार सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. चित्रकला, शिल्पकला, गायन, वादन, नाट्य आणि अभिनयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून दिले. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, खासदार स्मिता वाघ, केसीई सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य व स्वागताध्यक्ष भालचंद्र पाटील, प्रसिद्ध तबलावादक उन्मेष बॅनर्जी, स्पीक मेकेचे समन्वयक डॉ. सिंपी सिंग आणि केसीई सोसायटीच्या शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार स्मिता वाघ यांनी युवा पिढीने कला सादर करण्यासोबतच कलेविषयीचे ज्ञान वाढविण्यासाठी अशा सांस्कृतिक परिषदांची गरज असल्याचे सांगितले. तर अॅड. प्रकाश पाटील यांनी कला हे सामाजिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन केले.चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत १३ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांना नामांकित तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच विविध कलावंतांचे सादरीकरण अनुभवता येणार आहे. गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील तब्बल ३१० नोंदणीकृत विद्यार्थी या परिषदेत सहभागी झाले आहेत.
दिग्गज कलावंतांच्या नावाने दालनांना नामकरण
परिषदेत विविध कलादालनांना ज्येष्ठ कलावंतांची नावे देण्यात आली आहेत. नृत्य दालनाला दिवंगत पंडित बिरजू महाराज, संगीत दालनाला पंडित पलूसकर-पंडित भातखंडे, तबला वादन दालनाला दिवंगत तबलावादक पंडित झाकीर हुसेन, तर चित्रकला दालनाला चाळीसगावचे प्रसिद्ध कलावंत केकी मूस यांच्या स्मरणार्थ नामकरण करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी रसिका ढेपे यांनी केले, तर आभार शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मानले. कार्यक्रमाला केसीई सोसायटीचे व्यवस्थापन परिषद सदस्य, विविध शाखांचे प्राचार्य व प्रमुख, शिक्षक, खान्देशातील कला, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विद्यार्थी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.