१ हजाराची लाच : आमोदयाचा तलाठी ACB च्या जाळ्यात..

यावल : शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर बोअरवेलची (कुपनलिक) नोंद घेऊन त्याचा उतारा देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. शैलेश अंकुश झोटे (वय ३८), तलाठी, सजा आमोदा, ता. यावल, जि. जळगाव असे कारवाई झालेल्या तलाठ्याचे नाव आहे.
तक्रारदाराने आपल्या शेतात सिंचनासाठी कुपनलिका केली होती. शासनाच्या योजनेअंतर्गत सोलर सिस्टीम बसविण्यासाठी ७/१२ उताऱ्यावर कुपनलिकेची नोंद आवश्यक असल्याने त्यांनी तलाठी शैलेश झोटे यांच्याकडे नोंद घेण्यासाठी संपर्क केला. यावेळी नोंद घेऊन उतारा देण्यासाठी तलाठ्याने ४ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने नाईलाजास्तव यापूर्वी ३ हजार ५०० रुपये रोख दिले होते. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी कामाबाबत विचारणा केली असता उर्वरित ५०० रुपये तसेच ७/१२ उतारा देण्यासाठी अतिरिक्त ५०० रुपये, अशी एकूण १ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी तक्रारदाराने ६ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली. तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तलाठ्याने यापूर्वी ३ हजार ५०० रुपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित १ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे एसीबीच्या कारवाईत समोर आले.

त्यानंतर आमोदा येथील ग्रामपंचायत कार्यालयात पंचांसमक्ष तलाठी शैलेश झोटे यांनी १ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीने कारवाई केली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.