जिल्ह्यातील शाळा-अंगणवाड्यांचा होणार कायापालट : प्रमाणित आराखड्यांनुसार कामांचे नियोजन करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश..

जळगाव : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शाळा-अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासह सुरक्षित इमारती, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. १२) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व अंगणवाड्यांच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाबाबत बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी व्यापक नियोजनाला मान्यता देण्यात आली.
लोकप्रतिनिधी करणार प्रत्यक्ष पाहणी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुविधायुक्त शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले. आमदार व लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील शाळा आणि अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील सुविधांची स्थिती तपासावी. आवश्यक कामे निश्चित करून त्यांचे प्राधान्यक्रमानुसार प्रस्ताव तयार करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. जनसुविधा योजनेअंतर्गत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रमाणित आराखड्यांनुसार होणार विकासकामे
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी बैठकीत प्रस्तावित कामांचे सादरीकरण केले. शाळांच्या इमारती व वर्गखोल्यांची दुरुस्ती, आवश्यकतेनुसार नवीन बांधकाम, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि अंगणवाड्यांमधील मूलभूत सुविधांसाठी प्रमाणित आराखडे तयार करण्यावर भर देण्यात आला.कामांच्या गुणवत्तेत एकसमानता राखणे, निधीचा प्रभावी वापर करणे आणि कामांच्या अंमलबजावणीत सुसूत्रता आणणे, हा या नियोजनामागील उद्देश आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन अधिक पाणी लागणारी बांधकामे टाळत अत्यावश्यक सुविधांची कामे प्राधान्याने हाती घेण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
‘जळगाव पॅटर्न’ राज्यासाठी आदर्श ठरणार?
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या उपक्रमाचे स्वागत करत शाळा व अंगणवाड्यांच्या आधुनिकीकरणासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांच्या बळकटीकरणावर भर दिला. आमदार किशोर पाटील यांनी हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरणारा ‘जळगाव पॅटर्न’ म्हणून विकसित व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार मंगेश चव्हाण यांनीही यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
बैठकीस वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार किशोरआप्पा पाटील, राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी आणि कार्यकारी अभियंता मनोज पाटील आदी उपस्थित होते.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, अमोल जावळे, चंद्रकांत सोनवणे आणि नंदकुमार महाजन हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामीण शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. नियोजनबद्ध कामे, दर्जेदार बांधकाम आणि निधीचा प्रभावी वापर यांद्वारे जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधांचा दर्जा उंचावण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर असेल.