चोपडा शहरात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : ५ पीडित महिलांची सुटका, दोन ताब्यात..

चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापाराविरोधात मोठी कारवाई करत शहरातील एका ठिकाणी सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतर नऊ आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे २९ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.४० वाजता प्रताप हायस्कूलच्या मागील बाजूस, तहसील कार्यालयाजवळील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. या ठिकाणी महिलांना आर्थिक फायद्यासाठी आश्रय देऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे तपासात उघड झाले.
या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२४/२०२६ अन्वये अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ (PITA) च्या कलम ३, ४, ५ व ७ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी पाच पीडित महिलांची सुटका केली. प्राथमिक तपासात या महिला राजस्थान व नेपाळ येथील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना आवश्यक संरक्षण, वैद्यकीय मदत व समुपदेशनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात शिल्पा राजू लामा व पूजा टीकाराम थापा या दोन आरोपी महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतर नऊ आरोपी फरार असून त्यांच्या अटकेसाठी विशेष पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.
चोपडा शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मानवी तस्करी, वेश्याव्यवसाय किंवा महिलांच्या शोषणासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी. अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.