चोपड्यात बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त : चोपडा पोलिसांची कारवाई..
चोपडा शहर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरक्षक पवन देसले यांनी पदभार घेताच ही कारवाई केल्यामुळे अवैध धंदयावाल्यांचे धाबे दनाणले आहे.

चोपडा : शहर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अकुळखेडा शिवारात सुरू असलेल्या बनावट विदेशी दारू निर्मिती केंद्रावर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत १ लाख ८ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अकुळखेडा शिवारातील गिरीराज लॉन्सजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या बनावट विदेशी दारू तयार केली जात होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा छापा टाकला असता, ‘रॉयल स्टॅग’ या ब्रँडच्या नावाने बनावट मद्याची निर्मिती व पॅकिंग सुरू असल्याचे उघड झाले. या ठिकाणी मानवी आरोग्यास घातक ठरू शकणारे रसायन वापरून बनावट दारू तयार केली जात होती.छाप्यामध्ये पोलिसांनी १८० मिलीच्या भरलेल्या बनावट दारूच्या बाटल्या, ३० लिटर बनावट मद्य, २५०० रिकाम्या काचेच्या बाटल्या, ५००० सीलिंग बूच, गुळमिश्रित रसायन, पॅकिंग साहित्य तसेच मोबाईल फोन असा मोठा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण शिंपी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी म्हणून राजवर्धन पाटील, कपिल पाटील आणि रवींद्र पाटील यांच्यावर भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी पुढील तपास करत आहेत. नव्या निरीक्षकांनी रुजू होताच केलेल्या या धडक कारवाईमुळे चोपड्यातील अवैध व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या या कारवाईची शहरभर चर्चा सुरू आहे.