जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची मोहीम, इतक्या जनावरांची केली तपासणी
जळगाव प्रतिनिधी | गाय व म्हैसवर्गीय जनावरांमध्ये शंभर टक्के प्रजनन क्षमता व्हावी, त्यांचे वंध्यत्व कमी व्हावे. यासाठी जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत १३६९ शिबिराच्या माध्यमातून २३९३६ जनावरांची वंध्यत्व तपासणी करण्यात आली. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.श्यामकांत पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यात १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत विशेष मोहीम घेत वंध्यत्व निवारण अभियान राबविण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात जिल्ह्यात वंध्यत्वाने बाधित दुभती जनावरे यांची तपासणी करून त्यांच्या उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. देशपातळीवर महाराष्ट्राचा दूध उत्पादनात सहावा क्रमांक असून २०१९ च्या २९ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात ८ लाख ५० हजार गाय व म्हैस वर्ग पशुधन आहेत, यातील ३५८२५० गाय व म्हैस वर्गीय जनावरे प्रजननक्षम आहेत. या अभियानातील शिबिरात गाई म्हशींच्या प्रजनन माजाचे चक्र, माज लक्षणे, म्हशीं मधील मुका माज, कृत्रिम रेतन गर्भ तपासणी, वंध्यत्व निवारण, वैरण विकास कार्यक्रम, पशु यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्याने १६०१ वंध्यत्व शिबिरांमध्ये १८९४२ जनावरांची तपासणी केली. तर जळगाव जिल्ह्याने १३६९ शिबिरात २३९३६ जनावरांची तपासणी केली. अहमदनगरपेक्षा तुलनेने कमी मनुष्यबळ असतांनाही जळगाव जिल्ह्याने अहमदनगर जिल्ह्यापेक्षा जास्त तपासणी केल्या आहेत.
जिल्ह्यात वंध्यत्वाचा त्रास असणारे २३९३६ जनावरांवर वंध्यत्व तपासणी करण्यात आलेली आहे व २१४३९ जनावरांवर वंध्यत्व निवारणासाठी उपचार करण्यात आलेले आहे. तसेच जिल्ह्यात असणाऱ्या १८२ पशु उपचार करणाऱ्या संस्थांमध्ये पशुसंवर्धन उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक आणि खासगी पशुधन पर्यवेक्षक यांनी शिबिरात जनावरांवर उपचार केले आहेत. लोकांच्या सक्रिय सहभागाने सदर शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यापुढे जी जनावरे उपचार व तपासलेले आहे त्यांना माज आल्यावर शासकीय पशुवैद्यकीय संस्थांशी संपर्क करून कृत्रिम रेतन करून घ्यावे , असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शामकांत पाटील यांनी केले आहे.