सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून नाबार्ड व दि जळगाव पीपल्स कोऑप बँक संचलित बचत गट सदस्यांसाठी एकदिवसीय नेतृत्व विकास कार्यक्रम संपन्न
जळगाव ३ जानेवारी – सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून नाबार्ड प्रायोजित व दि जळगाव पीपल्स कोऑप बँक आयोजित नेतृत्व विकास कार्यक्रम दि.३ जानेवारी २०२४ रोजी बँकेचे मुख्य कार्यालय, दाणा बाजार, जळगाव येथे घेण्यात आला.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन नाबार्डचे सहा.महाव्यवस्थापक मा.श्री.श्रीकांत झांबरे तसेच मा.माधवजी धकाते- संचालक, रूरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टीट्युट, यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक,श्री.श्रीकांत झांबरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नाबार्ड कडून महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात, त्याचा लाभ घ्यावा.त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुलेचे विचार आचरण्यात आणणे गरजेचे आहे. महान व्यक्तींचा आपण आदर करतोच मात्र त्यांचे विचारांमधून प्रेरणा घेऊन कृती करणे महत्वाचे आहे. तसेच स्त्रीयांना मानाची वागणूक द्यावी व याची सुरुवात स्वतःपासून करावी असे सांगितले.
मा.श्री.माधवजी धकाते यांनी बचत गट सदस्यांना बचत गटासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली व त्याचा उपयोग आपापल्या कामात कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले.बचत गट सभासद सौ.मनिषा बागुल व सौ.अमिता बारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बँकेच्या बचत गट विभाग प्रमुख सौ.शुभश्री दप्तरी यांनी ‘सुदृढ नेतृत्व व सक्षम बचत गट’ या सदरांतर्गत फक्त बचत गट सुरु करुन उपयोग नाही तर त्याचे कामकाज व व्यवस्थापन कसे करावे, बचत गट अध्यक्षाने कसे काम करावे, सर्व सभासदांनी त्यांना साथ देऊन बचत गट कसा भक्कम ठेवावा याबद्दल माहिती दिली.
बँकेचे एमडी व सीइओ श्री.रोहित भुजबळ यांनी महिला बचत गट व बँकींग व्यवहारांचे दैनंदीन आयुष्यातील महत्व समजवून सांगितले. तसेच महिलांनी मुख्य आर्थिक प्रवाहात येण्यासाठी बचत गट हा उत्तम उपाय असून त्याचा आपल्या घरगुती कामासाठी तसेच व्यवसायासाठी काय उपयोग करता येतो ते विषद केले. दि जळगाव पीपल्स कोऑप बँकेशी 1935 पेक्षा जास्त बचत गट जुळलेले असून बँक आर्थिक समावेश अंतर्गत या गटांसाठी विविध विकसनशील, उद्यमशिल कार्यक्रम राबवित असते असे सांगितले.बँकेच्या बचत गट समन्वयिका सौ.अनिता वाघ यांनी ‘खेळातून नेतृत्वाकडे’ या सदराखाली विविध खेळांतून नेतृत्व, सांघिकता याचे महत्व बचत गटाच्या अनुषंगाने सांगितले.