धुळेब्रेकिंग

७ लाख ५० हजारांची लाच : धुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील फिटर सह खाजगी पंटर ACB च्या जाळ्यात..

धुळे : सुरक्षा रक्षक मंडळात पाच सुरक्षा रक्षकांची नोंदणी करून देण्यासाठी तब्बल ७ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करत ४ लाख ८० हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताना खासगी इसम बारकु काळु पाटील याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणात जिल्हा परिषद, धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील फिटर पुरुषोत्तम मंगाजी वाघ याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे मागील १४ महिन्यांपासून जिल्हा परिषद, धुळे येथे तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. शासनाच्या १७ ऑक्टोबर २०१३ रोजीच्या नियमानुसार खासगी सुरक्षा एजन्सीमध्ये सलग ६० दिवस काम केल्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षक म्हणून नोंदणी करण्याची प्रक्रिया आहे.

तक्रारदारांसह अन्य चार सुरक्षा रक्षकांची नोंदणी करून देण्यासाठी पुरुषोत्तम वाघ आणि खासगी इसम बारकु पाटील यांनी प्रत्येकी १ लाख ५० हजार रुपये, अशा पाच जणांसाठी एकूण ७ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे. यापैकी तक्रारदाराने यापूर्वीच १ लाख रुपये दिले होते. मात्र, त्यानंतरही संबंधितांचे काम झाले नसल्याने तक्रारदाराने ८ ऑगस्ट रोजी पुरुषोत्तम वाघ यांची भेट घेऊन कामाबाबत विचारणा केली.

यानंतर तक्रारदाराने ११ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने ११ व १२ ऑगस्ट रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी पुरुषोत्तम वाघ आणि बारकु पाटील यांनी यापूर्वी १ लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित ६ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वतःसाठी आणि वरिष्ठांसाठी मागितल्याचे निष्पन्न झाले.तडजोडीनंतर लाचेची रक्कम ५ लाख ८० हजार रुपये ठरविण्यात आली. यापूर्वी १ लाख रुपये स्वीकारले असल्याने उर्वरित ४ लाख ८० हजार रुपये बारकु पाटील यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले.

त्यानुसार १२ ऑगस्ट रोजी पारोळा शहरातील हॉटेल ग्रीन पार्क येथे बारकु पाटील याने पंचांसमक्ष ४ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताच ACB पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम ७, ७-अ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीच्या नावाखाली मोठ्या रकमेची लाच मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे