पाचोरा – पाचोरा शहरात आज सायंकाळी शहरातील बसस्थानक परिसरात तरुणावर अंदाधुंद गोळ्या झाडण्यात आल्या. अज्ञात व्यक्तींनी आकाश कैलास मोरे या तरुणावर आज सायंकाळी 6 च्या सुमारास अदाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण पाचोरा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज रोजी संध्याकाळी दोन संशयित मारेकरी दुचाकीवरून आले. त्यांनी बसस्थानकाजवळ असलेल्या आकाश मोरे वर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने परिसर सील करून पंचनामा केला आणि गंभीर जखमी झालेल्या आकाश मोरेला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी शहरात नाकाबंदी सुरू केली असून, विविध पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक लॅबला या घटनेची माहिती दिल्याने फॉरेन्सिक व्हॅनही घटनास्थळी दाखल झाली. पाचोरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.