जळगावात भरारी फाऊंडेशन तर्फे बहिणाबाई महोत्सव २०२५ चे आयोजन..
यंदा १० वे वर्ष मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले जाणार...
जळगाव – खान्देशातील सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा आणि बचत गटाच्या महिलांना व लघु उद्योजकांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सव २०२५ याचे दहावे वर्ष मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले जाणार आहे. २३ ते २७ जानेवारी २०२५ दरम्यान जळगावच्या बॅ. निकम चौक, सागर पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक, खाद्य व कला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचा मुख्य उद्देश खान्देशातील महिला बचत गट व लघु उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून त्यांचे आर्थिक उन्नती साधणे हा आहे. महोत्सवाच्या माध्यमातून त्या महिलांना आणि उद्योजकांना योग्य मूल्य मिळावे व त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, हे महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
खाद्य महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम
बहिणाबाई महोत्सवाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे ‘बहिणाबाई खाद्य महोत्सव’, जिथे महिलांनी तयार केलेले विविध खान्देशी खाद्य पदार्थ जळगावकर नागरिकांनी स्वाद घेतला. भरीत भाकरी, शेवभाजी, खापरावरची पुरणपोळी आणि इतर पारंपरिक पदार्थ या महोत्सवात विशेष आकर्षण असतात.यावर्षीच्या महोत्सवात प्रसिद्ध सिने अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिनेता कुशल बद्रिके यांचा “चला हवा करूया” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच, सुप्रसिद्ध लावणीकलावंत शाहीर मीरा दळवी यांचा “ही लावणी महाराष्ट्राची” कार्यक्रम, शाहीर सुमित धुमाळ यांचा ‘शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण’ शाहिरी पोवाडा व गोंधळ कार्यक्रम, अकोला येथील प्रसिद्ध भारुडकार विद्या भगत यांचा ‘भारुड प्रबोधनाचे’ कार्यक्रम हे महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहेत.
फॅशन शो आणि लोककला
यावर्षीच्या महोत्सवात साज मेकअप स्टुडिओ यांच्या वतीने ‘मराठी संस्कृतीचा फॅशन शो’ देखील आयोजित केला जात आहे. खान्देशातील विविध लोककलांचे, शाहीरी, भारूड, लोकगीते, लोकनृत्य, वहीगायन अशा विविध लोककला सादर केल्या जातील. शालेय व महाविद्यालयीन युवा कलावंतांना या महोत्सवात आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
बहिणाबाई पुरस्कार
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योग व महिला विकासाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी ‘बहिणाबाई पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी जळगाव शहराच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘रायझिंग जळगाव’ या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.
एक लाख नागरिकांचा सहभाग अपेक्षित
गत नऊ वर्षांमध्ये जळगाव शहरासह जिल्हाभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने महोत्सवात सहभाग घेतला आहे. यावर्षी देखील अंदाजे १ लाख नागरिक या महोत्सवाला भेट देतील अशी अपेक्षा आहे.
नागरिकांनी महोत्सवात हजेरी लावावी
बहिणाबाई महोत्सवाचे दहावे वर्ष खान्देशातील खाद्य संस्कृती व लोककलेच्या जागराने साजरे होणार आहे. जळगावकर नागरिकांना मोठ्या संख्येने या महोत्सवात हजेरी लावून शहरातील सर्वात मोठ्या लोक उत्सवाचा हिस्सा होण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या महोत्सवामुळे खान्देशाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासास निश्चितच मोठे चालना मिळणार आहे, आणि येणाऱ्या वर्षांमध्ये या महोत्सवाचे महत्त्व अधिक वाढणार आहे.
भरारी फाऊंडेशनच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला दीपक परदेशी, विनोद ढगे, डॉ.दीपक पाटील, जयेश पाटील, विक्रांत चौधरी, चित्रा चौधरी, रोहिणी मोराडे, वर्षा महाजन आदी उपस्थित होते. प्रसंगी बोलताना आयोजकांनी, यंदा जेष्ठ समाजसेवक दलूभाऊ जैन, कोठारी उद्योग समूहाचे रजनीकांत कोठारी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, वाचन संस्कृती रुजण्यासाठी ८ बाय १२ फुट पुस्तकाची प्रतिकृती साकारणार आहेत. महाराष्ट्र सॅटर्ड क्लब देखील यंदा जुळलेला असून २६० स्टॉल असणार आहेत. त्यात राज्यभरातील उद्योग आणि बचतगटांचा समावेश आहे. मुंबई येथील नायर हॉस्पिटल डॉ.विरेन ठक्कर यांचे पथक मोफत अँक्युपंक्चर शिबीर घेणार आहे. जालिंदर सुपेकर, अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.