जळगावात तरुणाचा निर्घृण खून : ७ जण गंभीर जखमी..
जळगाव (प्रतिनिधी) – पिंप्राळा येथे पूर्व वैमनस्यांतून एका तरुणाची चॉपर आणि कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज 19 रविवार रोजी सकाळच्या सुमारास पिंप्राळा येथे घडली असून या प्राण घातक हल्ल्यामुळे ५ ते ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. मुकेश रमेश शिरसाट वय 26 राहणार पिंप्राळा हुडको असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पिंप्राळा हुडको परिसरात राहणाऱ्या शिरसाठ कुटुंबावर जुन्या भांडणातून आलेल्या हल्लेखोरांनी मुकेश रमेश शिरसाठ याच्यासह त्याच्या कुटुंबातील निळकंठ सुखदेव शिरसाठ वय 45, कोमल निळकंठ शिरसाठ वय 20, ललिता निळकंठ शिरसाठ वय 30, आणि सनी निळकंठ शिरसाट( वय 21 ) या सर्व जणांवर चॉपर,कोयता आणि चाकू सारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली.यामध्ये मुकेश शिरसाट या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी शिरसाट कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेऊन प्रचंड आक्रोश केला. घटनेची माहिती कळताच रामानंद नगर पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांचे आणि एलसीबी चे पोलीस निरीक्षक आदींनी घटनास्थळी धाव घेतली . यावेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान हल्ले खोरांचा पोलीस तपास करीत असून या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.