रेल्वे आरक्षण ई-तिकिटांचा अवैध काळाबाजार करणाऱ्यास अटक…
4 लाखाची रेल्वे आरक्षण ई तिकिटे जप्त.
भुसावळ – रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या अवैध व्यवहारासाठी संशयास्पद युजर आयडीचा वापरकरून तिकिटे बनवित असे त्याचा तपास पुणे सायबर सेलने केला. वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त, भुसावळ यांच्या निर्देशानुसार आरोपीला अटक करण्यात आले आहे.आरोपीचे नाव ज्ञानेश्वर गुलाब पाटील (वय 38 वर्षे), रा. मुकटी ता. धुळे असे आहे.
याबाबत मध्य रेल्वे जनसंपर्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 26 मार्च 2025 रोजी पुणे सायबर सेलकडून रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या अवैध काळाबाजारीमध्ये संलग्न असलेल्या एका संशयित व्यक्तीबाबत माहिती मिळाली. या माहितीनुसार रेल्वे संरक्षण दल (RPF) चौकी धुळे अंतर्गत चाळीसगाव येथे गुन्हा नोंदविण्यात आला. ज्ञानेश्वर गुलाब पाटील (वय 38 वर्षे), रा. मुकटी ता. धुळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे
ज्ञानेश्वर गुलाब पाटील याने रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या अवैध व्यवहारासाठी संशयास्पद युजर आयडीचा वापर केला होता, ज्याचा तपास पुणे सायबर सेलने केला. वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त, भुसावळ यांच्या निर्देशानुसार निरीक्षक, चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक गठीत करण्यात आले. या पथकामध्ये एसआयपीएफ आर. के. सिंग, राजेंद्र भामरे व आरक्षक राकेश खलाणे यांचा समावेश होता. पथकाने संबंधित व्यक्ती आणि युजर आयडीची पडताळणी करून आरोपी रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या अवैध काळाबाजारीमध्ये गुंतलेला असल्याचे निष्पन्न केले.
आरोपीकडून एकूण 243 रेल्वे आरक्षण ई-तिकिटे जप्त करण्यात आली, ज्यांची एकूण किंमत 4 लाख 20 हजार 962.50 इतकी आहे. यामध्ये 88 आगाऊ प्रवासाची ई-तिकिटे किंमत 1लाख 78 हजार 213.90 आणि 155 प्रवास पूर्ण झालेली ई-तिकिटे किंमत 2 लाख ,42 हजार 748.60 यांचा समावेश आहे. तसेच, आरोपीने अवैध तिकिट बुकिंगसाठी वापरलेला रेडमी कंपनीचा मोबाइल फोन देखील जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी आरोपीविरुद्ध रेल्वे अधिनियम 1988 च्या कलम 143 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून BNSS कायदा 2023 च्या कलम 35(3) नुसार त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.
ही कारवाई निरीक्षक, चाळीसगाव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पुढील तपास सहायक उपनिरीक्षक राजेंद्र भामरे करीत आहेत.