3600 रु.लाचेची मागणी : लाचखोर मुख्याध्यापक पुन्हा ACB च्या जाळ्यात..

जळगाव : एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील श्री. संत हरिहर माध्यमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक संदिप प्रभाकर महाजन यांच्याविरुद्ध एका शिपायाच्या पत्नीचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप महाजन यांच्याविरुद्ध यापूर्वीही वेतन निश्चितीच्या फरकापोटी लाच घेतल्याचा गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणी तक्रार दाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार संत हरिहर महाराज माध्यमिक विद्यालयात शिपाई आहेत. त्यांनी त्यांच्या पत्नीचे २३,८१५ रुपयांचे वैद्यकीय बिल मंजुरीसाठी मुख्याध्यापक संदिप महाजन यांच्याकडे सादर केले होते. हे बिल स्वतःच्या ओळखीने सिव्हिल हॉस्पिटल जळगाव आणि वेतन अधीक्षक, माध्यमिक शिक्षण विभाग जळगाव यांच्याकडे प्रस्ताव सादर करून मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक महाजन यांनी तक्रारदाराकडे ५,००० रुपयांची लाच मागितली. पडताळणीअंती, मुख्याध्यापक महाजन यांनी वैद्यकीय बिल मंजूर करून देण्यासाठी तडजोडीअंती बिलाच्या एकूण रकमेच्या १५% प्रमाणे ३,६०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाच स्वीकारली नसली तरी, लाचेची मागणी करून ती मिळवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्याविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या अगोदर ही घेतली होती लाच..
मुख्याध्यापक संदिप महाजन यांनी यापूर्वीही तक्रारदार शिपाई यांच्याकडून वेतन निश्चितीच्या २,५३,७८० रुपयांच्या फरकापोटी ५% प्रमाणे १२,५०० रुपयांची मागणी करून १०,००० रुपयांची लाच स्वीकारली होती. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात २७ जून २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या नवीन प्रकरणात देखील कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर सफौ सुरेश पाटील पोहेकॉ किशोर महाजन, पो.ना. बाळू मराठे आणि पोकॉ प्रदीप पोळ यांनी केली.