अवैध गॅस भरणा केंद्रावर धाड ६१ गॅस सिलिंडर जप्त, शनिपेठ पोलीसांची कारवाई ..
जळगाव – जिल्ह्यातील शनिपेठ पोलिसांनी मोहन टॉकीज परिसरातील असोदा रोडवरील पिवळ्या भिंती भागातील एका घरात सुरू असलेल्या अवैध गॅस भरणा केंद्रावर छापा टाकून ६१ गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. या कारवाईमुळे अवैध गॅस रिफिलिंगचा काळाबाजार समोर आला आहे.
सदर कारवाईत जप्त केलेल्या सिलिंडरमध्ये २८ व्यावसायिक सिलिंडर (१० भरलेले, १८ रिकामे) आणि ३३ घरगुती सिलिंडर (१३ भरलेले, १० रिकामे) यांचा समावेश आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपी वाहन चालक आदेश राजू पाटील, राहुल नारायण सोनवणे आणि राकेश नारायण सोनवणे यांच्याविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शनिपेठ पोलीस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने ही कारवाई केली. या अवैध गॅस भरणा केंद्रामुळे परिसरातील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेत आहेत.