भडगाव – तालुक्यातील मांडकी येथील ग्रामसेवकासह रोजगार सेवक यांना ५ हजारांची लाच घेतांना जळगाव लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून सोनिराम धनराज शिरसाठ ग्रामसेवक व जितेंद्र लक्ष्मण चौधरी रोजगार सेवक असे नाव असून सदर या कारवाई मुळे लाच खोरांच्या गोठ्यात एकच खडबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांच्या मंजूर घरकुलाचा दुसरा हप्ता मिळावा यासाठी तसेच गट नंबर नमुना आठ मिळवण्यासाठी ग्रामसेवक सोनिराम धनराज शिरसाठ (वय ४७, रा. पाचोरा, जि. जळगाव) आणि रोजगार सेवक जितेंद्र लक्ष्मण चौधरी (वय ३८, रा. पाचोरा, जि. जळगाव) यांनी ६ हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने २३ जून २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.तक्रार मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, आरोपींनी ६ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ५ हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार, २३ जून २०२५ रोजी सापळा रचण्यात आला. या सापळा कारवाईदरम्यान, आरोपी ग्रामसेवक सोनिराम शिरसाठ आणि रोजगार सेवक जितेंद्र चौधरी यांनी पंचांसमक्ष ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम ५ हजार रुपये हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई ला.प्र.वि. जळगाव चे पोलिस उप अधीक्षक योगेश ठाकूर , पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी (नंदुरबार), पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव (जळगाव), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, पोलीस नाईक हेमंत पाटील, पोलीस नाईक सुभाष पावरा यांनी केली.