पाचोऱ्यात तलवारींचा मोठा साठा जप्त : पाचोरा पोलिसांची कारवाई..

पाचोरा : पोलिसांनी शहरात अवैधरित्या तलवारी बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. सोहेल शेख तय्यब शेख (वय २४, रा. स्मशान भूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल १८ तलवारी जप्त करण्यात आल्या असून, त्यांची किंमत अंदाजे ५४,००० रुपये आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पाचोरा येथील माहिजी नाका परिसरात तलवारी विक्रीसाठी आणल्याची खबर मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोहेल शेखला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने तलवारी बाळगल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याने लपवून ठेवलेल्या ठिकाणाहून या तलवारी जप्त केल्या. त्याने काही तलवारींची यापूर्वीच विक्री केली असल्याचेही सांगितले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनिरी. कृष्णा घायाळ, पोउपनिरी. कैलास ठाकुर, पोकॉ संदीप राजपुत, पोकॉ जितेंद्र पाटील, पोकॉ हरीश परदेशी यांनी केली.