जळगावात धारदार शस्त्राने तरुणाचा निघृण खून..

जळगाव – निमखेडी येथे रविवारी रात्री धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर साहेबराव सोनवणे या तरुणाची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या करण्यात आली आहे. या खळबळजनक घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी रात्रीच्या सुमारास हल्लेखोरांनी सागर सोनवणे याच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. डोक्यात गंभीर वार झाल्यानंतर त्याला निमखेडी गावातील राममंदिराच्याजवळ गंभीर जखमी अवस्थेत टाकून दिल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तातडीने सागरला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.मृत सागरच्या पश्चात त्याचे आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. प्राथमिक तपासात या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या खून प्रकरणी तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली असून, घटनेचा पुढील तपास वेगाने सुरू आहे.