जामनेर मध्ये साधना महाजन बिनविरोध नगराध्यक्षा..

जळगाव – जिल्ह्यातील १८ नगरपरिषद व नगर पंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी निवडणुका होत आहेत आणि ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्याआधीच जामनेर नगरपरिषदेतून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.
जामनेर नगरपरिषदेत भाजपा उमेदवार तसेच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या सौभाग्यवती साधना महाजन या नगराध्यक्षा बिनविरोध निवडून आल्या आहेत. नगराध्यक्षपदाचे आरक्षण यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले होते. उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर भाजपने साधना महाजन यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली.साधना महाजन यांना यापूर्वीही नगराध्यक्षा म्हणून काम करण्याचा अनुभव असल्याने त्यांचे नाव भाजप वरिष्ठांकडून पसंत करण्यात आले होते. निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी पूर्ण ताकद लावत वातावरण भाजपाच्या बाजूने वळवले. परिणामी राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपापली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे साधना महाजन या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
जामनेर नगरपालिका ही जळगाव जिल्ह्यातील पहिली बिनविरोध नगराध्यक्ष निवडणारी नगरपालिका ठरली आहे. यापूर्वी बिनविरोध झालेल्या नगरसेवकांच्या नावे अशी: उज्वला दीपक तायडे, किलुबाई शेवाळे, सपना रवींद्र झाल्टे, संध्या जितेंद्र पाटील आणि नानाभाऊ बाविस्कर.मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रभावाखालील जामनेर नगरपालिकेत भाजपने आघाडी घेतली असून एकूण २७ पैकी ५ जागा बिनविरोध झाल्या आहेत.