जामनेर मध्ये नमो कुस्ती महाकुंभ-२ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा संपन्न..
जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका ही अभिमानास्पद बाब– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जामनेर – सध्या जागतिक पटलावर देशाचे, विशेषतः महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव कमावत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या नमो कुस्ती महाकुंभ-२ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.या वेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे रामदास तडस, जामनेरच्या माजी नगराध्यक्ष साधनाताई महाजन, कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी, विविध देशांतून आलेले कुस्तीपटू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, “ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ, एशियन गेम्स किंवा अन्य स्पर्धांमध्ये देशातील, विशेषतः महाराष्ट्रातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मागील काही काळात मॅटवरील कुस्तीमुळे आपण थोडे मागे पडलो होतो. मात्र, मातीवरील कुस्तीमध्ये आपल्या खेळाडूंनी दमदार पुनरागमन केले आहे. कुस्तीच्या माध्यमातून देशाला ऑलिम्पिकमधील पहिले पदक मिळवून देणारे खेळाडू खाशाबा जाधव होते. आजही महाराष्ट्राचे खेळाडू विजय चौधरी, सोनाली मंडलिक, राजीव पटेल यांनी आपल्या खेळाची चमक दाखवत परदेशी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आहे.”
या स्पर्धेत नऊ देशांतील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सहभागी झाल्याने या स्पर्धेची रंगत अधिक वाढल्याचे त्यांनी सांगितले. “गिरीशभाऊ हेही कुस्तीपटू होते आणि त्यांनी विद्यापीठस्तरीय कुस्तीत उत्तम कामगिरी केली होती. आता राजकारणातही त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना चित केले आहे!” असे मिश्कील टिप्पणी करत त्यांनी गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
“आजच्या स्पर्धेत महाराष्ट्राचे खेळाडू पृथ्वीराज पाटील, सोनाली मंडलिक, विजय चौधरी यांनी परदेशी खेळाडूंवर मात करत विजय संपादन केला. त्याबद्दल मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल गिरीश महाजन यांचेही मनःपूर्वक कौतुक करतो. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शांततेत स्पर्धेचा आनंद घेतला, हेच या स्पर्धेच्या यशाचे खरे लक्षण आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासह फ्रान्स, रोमानिया, इस्टोनिया, उझबेकिस्तान, जॉर्जिया आदी देशांतील जागतिक विजेते, ऑलिम्पियन, हिंदकेसरी, रुस्तम-ए-हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी अशा नामवंत कुस्तीपटूंनी सहभाग घेतला. अशा दर्जेदार स्पर्धांचे आयोजन जामनेरमध्ये होणे, हे कुस्तीच्या वाढीसाठी उत्तम वातावरण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या कुस्तीपटूंना मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाला कुस्तीगीर, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते