नरेंद्र अण्णांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रविण माळी यांचा अॅड. पियुष पाटील यांना जाहीर पाठिंबा..

जळगाव प्रतिनिधी I जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५-अ मध्ये एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रविण विष्णु माळी यांनी अपक्ष उमेदवार ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात प्रविण माळी यांनी सांगितले की, मा. स्व. नरेंद्रअण्णा पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आयुष्यभर सामाजिक, राजकीय व जनहिताचे कार्य केले. त्यांचा हा विचारांचा वारसा निरंतर सुरू राहावा, या उद्देशाने त्यांचे चिरंजीव अॅड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रविण माळी यांनी प्रभागातील सर्व मतदार, नागरिकांना जाहीर आवाहन करत म्हटले आहे की, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, स्वच्छ व पारदर्शक प्रशासनासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या ॲड. पियुष पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे.तसेच, मी शिवसेना (उबाठा) पक्षाचा अधिकृत उमेदवार असलो तरी जनहित व विचारांची सांगड घालत अपक्ष उमेदवार ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा देत असून, आगामी काळातही मी कायम त्यांच्या सोबत राहीन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या जाहीर पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक ५-अ मधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता असून, ॲड. पियुष पाटील यांच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र आहे. नागरिकांमध्येही या निर्णयाचे स्वागत होत असून, येत्या निवडणुकीत त्याचा थेट परिणाम दिसून येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.