जळगाव महापालिका निवडणूक : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा झंजावती प्रचार..
जळगाव – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी आक्रमक प्रचाराला सुरुवात केली आहे. “आमचे उमेदवार गरीब असले तरी निष्ठावान आहेत. माघारीसाठी मिळालेली ऑफर त्यांनी नाकारली. सर्वच लोक पैशांवर विकले जात नाहीत, हा संदेश आमच्या गरिब उमेदवारांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे,” अशा शब्दांत माजी आमदार संतोष चौधरी यांनी विरोधकांवर टीका केली.
रविवारी समतानगर परिसरात आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौधरी म्हणाले, “मेहरुण, महाबळ, समतानगरसह मोठा परिसर सन २००५ मध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघात होता. त्यामुळे येथील प्रत्येक भाग मला तोंडपाठ आहे. इथली माणसं जीवाला जीव देणारी आहेत.” शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेत किमान १५ ते २० नगरसेवक निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “इतके नगरसेवक निवडून आले तर विरोधकांची झोप उडेल. पुढे सत्ता स्थापनेसाठी काय करायचे याचा अनुभव मला आणि नाथाभाऊंना चांगला आहे,” असेही ते म्हणाले.
मलिदा लाटण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा डाव जळगावात सत्ताधाऱ्यांनी आधी रस्ते केले, नंतर जलवाहिनी टाकण्यासाठी तेच रस्ते खोदले. आता पुन्हा रस्ते केले जातील आणि नंतर भूयारी गटारीसाठी पुन्हा खोदकाम होईल. टेंडरमधून मलिदा लाटण्यासाठी हा सगळा खेळ सुरू असून एक विशिष्ट टोळी शहरात सक्रिय आहे. तिचा बंदोबस्त करण्याची हीच योग्य वेळ आहे, असा आरोप चौधरी यांनी केला.
त्यांनी आणखी एक किस्सा सांगताना म्हटले की, आमच्या एका उमेदवाराला महायुतीच्या नेत्यांकडून माघार घेण्यासाठी धमक्या दिल्या जात होत्या. मात्र त्याने त्याला भीक घातली नाही. “संतोष चौधरी यांच्याशी बोलून घ्या, मी अर्ज माघारी घेतो,” असा निरोप त्याने संबंधित पुढाऱ्याला दिला. मात्र माझे नाव ऐकताच तो पुढारी पुन्हा उमेदवाराला भेटायलाच गेला नाही.
सत्ताधाऱ्यांना पैशांचा माज : एकनाथ खडसे
यावेळी आमदार एकनाथ खडसे यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. “जळगाव महापालिका निवडणुकीत पैशांचा पूर आला आहे. उमेदवारांना प्रलोभने देण्यात आली, दमदाटी आणि गुंडगिरीने दहशत माजवली गेली. त्यामुळेच १२ नगरसेवक बिनविरोध निवडून आले,” असा आरोप त्यांनी केला.
“हिंमत असेल तर सुरेशदादा जैन आणि मी जशा निवडणुका लढलो, तशा लढवून दाखवा. राजकारण विचाराने केले पाहिजे, दमदाटीने नाही,” असा टोला खडसे यांनी लगावला. उमेदवारांना माघारीसाठी दहा, वीस लाख रुपये दिले जात आहेत, हे राजकारणाच्या अधःपतनाचे उदाहरण असून शहरातील राजकारण इतके घाणेरडे झाले आहे की किळस वाटायला लागली आहे, असेही त्यांनी सांगितले.