प्रभाग क्र. 5 मधून अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील यांना जनतेतून जोरदार प्रतिसाद..

जळगाव, प्रतिनिधी I शहरातील प्रभाग क्रमांक ५ अ मधील निवडणूक सध्या चांगलीच रंगात आली असून अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याविरोधात त्यांनी जोरदार आव्हान उभे केले असून ही लढत आता अत्यंत चुरशीची बनली आहे.
प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे रिंगणात असून त्यांच्यासमोर माजी नगरसेवक व समाजसेवक कै. नरेंद्र पाटील यांचे सुपुत्र, अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील यांनी ताकदीने उभे राहत निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे. कै. नरेंद्र पाटील हे वार्ड क्रमांक चारमधून सातत्याने अपक्ष म्हणून निवडून येत होते. वार्ड क्रमांक ४ चा मोठा भाग प्रभाग क्रमांक ५ मध्ये समाविष्ट झाल्यामुळे त्यांची पुण्याई आज पियुष पाटील यांच्या रूपाने मतदारांपर्यंत पोहोचताना दिसत आहे.
पियुष पाटील हे राजकारणात नवखे असले तरी आपल्या वडिलांच्या सामाजिक कार्याची ओळख व जनतेशी असलेले नाते याचा त्यांना मोठा फायदा होत आहे. मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून घराघरांतून त्यांना पाठिंबा वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, कै. नरेंद्र पाटील यांच्याप्रमाणेच पियुष पाटील हेही आक्रमक स्वभावाचे असून आपल्या भाषणांतून ते प्रतिस्पर्धी उमेदवारांवर थेट व जोरदार हल्ला चढवीत आहेत. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे तरुण मतदारांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील यांनी विष्णू भंगाळे यांच्यासमोर मोठे आणि निर्णायक आव्हान उभे केले आहे. जाहीर प्रचारासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक असून १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. सर्वच उमेदवारांमध्ये धाकधूक वाढवणारी ही निवडणूक सध्या प्रभाग ५ अ मध्ये चांगलीच रंगतदार बनली असून निकालाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.