रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत : अवैध गॅस भरणा केंद्रांवर पुन्हा Dysp पथकाची कारवाई..
रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने सर्रास सुरु ?

जळगाव (प्रतिनिधी): रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंप्राळा हुडको परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या आणि बेकायदेशीररीत्या रिफिलिंग करणाऱ्यांवर उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) नितीन गणापुरे यांच्या विशेष पथकाने धडक कारवाई करत टाकलेल्या छाप्यामुळे गॅस माफियांचे धाबे दणाणले असून, एकाच वेळी दोन ठिकाणी कारवाया करत मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दाट वस्ती असलेल्या पिंप्राळा हुडको भागात अवैध गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा सुरू असल्याची अत्यंत गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा होताच, गणापुरे यांनी त्वरित एक विशेष धडक पथक तयार केले आणि कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी अतिशय गुप्तपणे सापळा रचून या अड्ड्यांवर धाड टाकली.

या पथकाने पिंप्राळा हुडकोत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत अवैध गॅस रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य आणि गॅस सिलिंडर्सचा साठा जप्त करण्यात आला आहे.पहिल्या ठिकाणी छापा टाकला असता, तिथे पोलिसांना ५ गॅस सिलिंडर आणि गॅस भरण्यासाठी वापरला जाणारा १ इलेक्ट्रिक पंप आढळून आला.

दुसऱ्या ठिकाणी त्यापेक्षा मोठा साठा मिळाला. येथे पोलिसांना ७ गॅस सिलिंडर आणि १ पंप जप्त करण्यात यश आले.तसेच, या कारवाईदरम्यान दोन वजन काटे देखील जप्त करण्यात आले आहेत. भरवस्तीत सुरू असलेला हा धोकादायक खेळ पोलिसांनी उधळून लावला आहे.
सदर कारवाई
उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवेश शेख,प्रणय पवार,रवींद्र जाधव,रविंद्र मोतिराया, अमोल ठाकूर या.पथकाने केली.