जिल्हापेठ पोलीसांची कारवाई : २ गावठी कट्टे, ८ तलवारी सह दोघ जेरबंद..

जळगाव : जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना गोपनीय बातमी मिळाली होती की, रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी धीरज कोळी हा जळगाव शहरात वावरत आहे. या माहितीवरून तात्काळ एक पथक तयार करून शोध मोहीम राबवण्यात आली. आर. आर. शाळेच्या बाजूच्या गल्लीत पेट्रोलिंग करत असताना, एका मोटारसायकलवरून (क्र. एमएच १९ ए जेड २४१२) दोन संशयित येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून विचारपूस केली.धनंजय उर्फ धीरज दत्तू कोळी (वय २०, रा. पाळधी, ता. धरणगाव), अजय मारुती डोळे (वय २३, रा. नेरी दिगर, ता. जामनेर) यांच्या झडतीत शस्त्र मिळाली.

पोलिसांनी संशयितांची झडती घेतली असता, मोटारसायकलला बांधलेल्या पोतडीत एक तलवार मिळून आली. अधिक तपासणी केली असता, पेट्रोल टाकीच्या खाली इंजिनजवळ लपवलेला एक गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला. पुढील तपासात आणि ३ दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान, आरोपींकडून एकूण २ गावठी पिस्टल आणि ८ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपी धीरज कोळी याच्यावर धरणगाव आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. तो रामानंदनगर येथील खुनाच्या गुन्ह्यात फरार होता. आरोपी अजय डोळे याच्यावर नाशिक येथील अंबड पोलीस स्टेशनमध्ये आर्म अॅक्ट आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल आहे.
सदर कारवाई सपोनि अनिल वाघ, पो.उपनि गोपाळ देशमुख, जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचारी महेश महाजन, तुषार पाटील, गोविंद साबळे, विशाल साळुंखे, समाधान पाटील, राहुल पाटील, नरेंद्र दिवेकर, ईश्वर खवडे, जयेश मोरे, साहेबराव खैरनार यांनी केली.