जळगाव

भीषण अपघात : भरधाव टँकरच्या धडकेत महिला जागीच ठार..

बायपास बंद : शहरातील महामार्गावर मृत्यूचा सापळा..

जळगाव : तरसोद–पाळधी बायपास महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्यानंतर शहरातील जुन्या महामार्गावर वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला असून, त्याचे गंभीर परिणाम समोर येऊ लागले आहेत. बुधवारी सकाळी हॉटेल दरबार व सीएनजी गॅस पंप परिसरात भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या मंगला अर्जुन माळी (वय ५५, रा. ज्ञानदेव नगर) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा मुलगा भरत माळी (वय २९) जखमी झाला आहे.

मंगला माळी या मुलासह दुचाकीवरून पिंप्राळा येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी जात असताना मागून आलेल्या भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर त्या रस्त्यावर पडल्या आणि टँकरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा भरत माळी यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क नागरिकांनी त्याचा पाठलाग करून आकाशवाणी चौकाजवळील महादेव हॉस्पिटल परिसरात टँकर अडवला. त्यानंतर चालकाला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.या घटनेमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. अनेक वर्षे भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मंगला माळी यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना व नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान, बायपास महामार्गाचा भराव खचल्याने सर्व जड वाहतूक शहरातील जुन्या महामार्गावर वळविण्यात आली आहे. वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढत असून, भरधाव वाहनांवर कठोर कारवाई, वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी आणि शहरातील महामार्गावर तातडीने अतिरिक्त वाहतूक नियंत्रणाची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे