सार्वजनिक ठिकाणी सर्रास दारू पिणाऱ्या तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी : पोलीस अधीक्षकानांच उतरावे लागले रस्त्यावर..

जळगाव – शहरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी आता पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, स्वतः पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरून कारवाईचे नेतृत्व करत आहेत. सर्वसामान्य नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारी आणि सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारा त्रास लक्षात घेता ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये अजूनही काही नागरिक ग्रुप करून सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या जागांमध्ये तसेच रस्त्याच्या कडेला बसून सर्रास दारू पित असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीयांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होत असल्याने पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळपासून विशेष मोहिमेअंतर्गत विविध भागांत धडक कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. मोकळ्या जागांमध्ये, सार्वजनिक उद्याने, रस्त्याच्या कडेला किंवा चौकांमध्ये बसून दारू पिणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच अनेक वाइन शॉपच्या बाहेर आडोशाला उभे राहून किंवा कारमध्ये बसून मद्यपान करणाऱ्यांवरही पोलिसांची नजर राहणार आहे. अशा ठिकाणी गस्त वाढवून थेट दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय काही छोट्या हॉटेल्स व खाद्यपदार्थांच्या दुकानांबाहेरही खुलेआम मद्यपान होत असल्याच्या तक्रारी मिळाल्याने अशा ठिकाणांवरही पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
“कारवाई फक्त कागदावर न राहता ती समाजाला दिसली पाहिजे. नागरिकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होणे महत्त्वाचे आहे,” असा स्पष्ट संदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरातील विविध भागांमध्ये पोलिसांच्या अशाच धडक कारवाया पाहायला मिळण्याची शक्यpता आहे.