गुन्हेगारीभुसावळ

भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह दोघे जेरबंद : बाजार पेठ पोलिसांची कारवाई..

भुसावळ : शहरात बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन संशयितांना बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपींकडून ४१ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १४ मे २०२६ रोजी मध्यरात्री १२:१० वाजेच्या सुमारास शिरपूर-कन्हाळा रोडवरील घोडे पीर बाबा दर्ग्याच्या मागील मोकळ्या जागेत काही इसम संशयास्पद हालचाली करत असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तत्काळ पथक तयार करत घटनास्थळी धाड टाकली.यावेळी दोन संशयितांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या जवळून एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल, त्यासोबत मॅगझिन आणि एक जिवंत राऊंड आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलाची किंमत अंदाजे ४० हजार रुपये तर जिवंत काडतुसाची किंमत १ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्यांची नावे असद अली शेख खालीद अली (वय १९, रा. आझाद नगर, बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) आणि मोहम्मद राजीक मोहम्मद आरिफ (रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) अशी आहेत.

सदर कारवाई बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल टी. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल जावेद हकीम शाह यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध आर्म अ‍ॅक्ट कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे हे करीत आहेत. दरम्यान, शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे