जळगाव

जळगाव शहराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी मनपाचा १ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प..

महापौर दीपमाला काळे यांचे उद्योजकांना पुढाकार घेण्याचे आवाहन..

जळगाव : गेल्या काही दिवसांत जळगाव शहराचे तापमान ४४ ते ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यामुळे नागरिक कडक उन्हाने व उकाड्याने बेहाल झाले आहेत. या वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि भविष्यात शहरात ‘ग्रीन कव्हर’ (हरित क्षेत्र) वाढवण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने आगामी पावसाळ्यात तब्बल १ लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील उद्योजक व व्यापारी यांना तापमानातील वाढ रोखण्यासाठी वृक्षारोपणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.

महापौर काळे यांनी सांगितले की, “शहरातील वाढते तापमान हा चिंतेचा विषय बनला आहे. भविष्याचा विचार करता, या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महानगरपालिकेने १ लाख झाडे लावण्याचे नियोजन केले असून, लवकरच या मोहिमेला सुरुवात केली जाईल. या मोहिमेत जळगाव शहरातील सर्व उद्योजक व व्यापारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा.”

*हायवे आणि अतिक्रमणांच्या जागेवर होणार वृक्षारोपण*

शहरातील मुख्य हायवे (महामार्ग), बाजूचे रस्ते (साईड रोड) आणि महामार्गाच्या मधोमध असलेल्या ज्या जागांवरून नुकतेच अतिक्रमण हटवण्यात आले आहे, अशा सर्व मोकळ्या जागांवर प्राधान्याने झाडे लावण्याचा मानस महापौरांनी व्यक्त केला. या संदर्भात प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू असून, जागेचे नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांसांगितले.

“झाडे लावण्यापेक्षा ती जगवणे महत्त्वाचे” महापौरांचे आवाहन

केवळ शासकीय मोहीम म्हणून झाडे लावून चालणार नाही, तर त्यांचे अस्तित्व टिकवणे गरजेचे आहे, यावर महापौरांनी विशेष भर दिला. त्या म्हणाल्या, “वृक्षारोपण तर सर्वच करतात, पण लावलेली झाडे जगवणे आणि त्यांचे योग्य संगोपन करणे ही काळाची गरज आहे. मनपा प्रशासनातर्फे झाडे लावली जातील, परंतु त्यांच्या संगोपनासाठी मला संपूर्ण जळगावकरांची साथ हवी आहे.”

शहरातील उद्योजक, व्यापारी,सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी आणि जागरूक नागरिकांनी पुढे येऊन या लावलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घ्यावी, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच हवामान बदलावर नियंत्रण मिळवणे आणि भविष्यातील जळगावचे तापमान कमी करणे शक्य होईल, स्वच्छ शहर, हरित शहर, सुंदर शहर होण्यासाठी सर्वांकडून पुढाकार हवा असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे