फळबाग लागवड व्यवस्थापन प्रशिक्षण वर्ग संपन्न..
कमी पाऊस व अलनिनो सावट परिस्थितीला शेतकऱ्यांना सामोरे जाण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राकडून तांत्रिक मार्गदर्शन..

जळगाव – महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत *कृषि विज्ञान केंद्र जळगाव व सेवा सहयोग फाउंडेशन पुणे* यांच्या संयुक्त विद्यमाने फळबाग लागवड व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला.
या प्रशिक्षणासाठी केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ मा वैभव सूर्यवंशी, सेवा सहयोग फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक श्री अनिल पाटील, देवेंद्र नर्सरी मोरफळ चे संचालक श्री उमेश सोनार, केंद्राचे कृषी विद्या शास्त्रज्ञ डॉ शरद जाधव, उद्यानविद्या शास्त्रज्ञ श्री किरण जाधव व इतर शास्त्रज्ञ व कर्मचारी व सेवा सहयोग फाउंडेशन चे कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणा दरम्यान प्रथमतः कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरती शिवार फेरी आयोजित करण्यात आली या शिवार फेरीमध्ये श्री किरण जाधव ( शास्त्रज्ञ उद्यानविद्या) यांनी नैसर्गिक शेती व नैसर्गिक शेतीतील घटक निर्मिती व वापर, बांबू लागवड प्रक्षेत्र व विविध जाती, कृषी वानिकी (ऍग्रो फॉरेस्टरी) पीक पद्धती नैसर्गिक शेती प्रक्षेत्र व प्रयोग, फळबाग लागवड पूर्वतयारी, लागवड व त्यानंतरची निगा याविषयी सविस्तर मार्गदर्शन प्रक्षेत्रावरच पद्धत प्रात्यक्षिकानुसार केले.यानंतर डॉ शरद जाधव (शास्त्रज्ञ कृषीविद्या) यांनी आंतरपीक पद्धती, मिश्र पीक पद्धती सेंद्रिय घटकाचा वापर सांगताना मोठ्या प्रमाणावर शेतावरच काडी कचरा, शेणखत याचा उपयोग करून कमी खर्चात गांडूळ खत निर्मिती याचे पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. तसेच विद्यापीठाद्वारे राबविण्यात येणाऱ्या संतुलित खताचा वापर अभियानाद्वारे प्रसारित होणाऱ्या तंत्राचा शेतकऱ्यांची संवाद साधला.
यानंतर श्री वैभव सूर्यवंशी (शास्त्रज्ञ कृषी अभियांत्रिकी) यांनी फळबाग पिकामध्ये लागवडीपासूनच वापरावयाचे कृषी यांत्रिकीकरण व ठिबक सिंचन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. श्री उमेश सोनार संचालक देवेंद्र नर्सरी मोरफळ यांनी बांबू लागवड लागवड, मिलीया डुबिया लागवड, चंदन या पिकांचा कृषी वानिकी पीक पद्धतीमध्ये अवलंब करून शेतकऱ्यांना पेन्शन मिळणे इतपत उत्पन्न कसे घेऊ शकतो हे सादरीकरणाद्वारे शेतकऱ्यांना सांगितले.
सेवा सहयोग फाउंडेशनचे समन्वयक श्री अनिल पाटील यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शन माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील सहा गावांमध्ये 50 शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचे प्रोत्साहन राबविण्यात येणारा प्रकल्प याविषयी सविस्तर समजावून सांगितले. यामध्ये चाळीसगाव तालुक्यातीलदहा गावातील (चिंचगव्हाण, टेकवाडे, ढोमणे, अलवाडी, बोरखेडा, भऊर, धामणगाव, पिंपळवाडी, ब्राम्हण शेवगे, कुंझर) 50 शेतकरी या प्रशिक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्र येथे उपस्थित होते. यानंतर *शेतकरी अभ्यास दौरा* म्हणून दुपारच्या सत्रामध्ये जैन हिल्स जळगाव येथे डॉ बी डी जडे (वरीष्ठ कृषि विद्या शास्त्रज्ञ) यांनी येथील विविध पिकाच्या हायटेक तंत्रज्ञानाचे व बाग व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक, ठिबक सिंचन व फर्टिगेशन, रेनगन, बेड पध्दती शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.
या संपूर्ण प्रशिक्षण वर्गातून शेतकऱ्यांना येत्या हंगामातील आणि कमी पावसाच्या सावट अश्या परिस्थिती अंतर्गत विविध पीक पद्धती आंतरपीक पद्धती मिश्र पीक पद्धती वाणांचा वापर बेडवर ठिबक सिंचनाचा योग्य वापर तसेच कृषी विद्या वाणी की पद्धती वन उद्यान विद्यापीठ पद्धती यावर मार्गदर्शन करून येणाऱ्या हंगामामध्ये उद्भवणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ नक्की मिळेल.
प्रशिक्षण वर्ग ठळक वैशिष्ट्य
1) अल निनो व कमी पाऊस अंदाज परिस्थितीत केव्हीके चे मार्गदर्शन*
2) दहा गावातील 50 सहभागी शेतकरी करणार फळबाग लागवड (चिंचगव्हाण, टेकवाडे, ढोमणे, अलवाडी, बोरखेडा, भऊर, धामणगाव, पिंपळवाडी, ब्राम्हण शेवगे, कुंझर)*
3) प्रशिक्षण मध्ये पद्धत प्रात्याक्षिक, शिवरफेरी, अभ्यास दौरा चे समायोजन*
4) फळबाग लागवड मध्ये संतुलित खते वापर, जैविक घटक निर्मिती व वापर, ठिबक, गादीवाफा यावर भर*
5) कृषि-वानिकी पीक पद्धती अंतर्गत बाबू, साग, महोगनी, मिलिया डूबिया, चंदन लागवडीवर भर*