जळगाव जिल्हा

२८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम : जिल्ह्यात ४ लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोस देणार..

जळगाव :- केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दि.२८ जून २०२६ रोजी संपूर्ण देशभर राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार असून जिल्ह्यात पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक सूक्ष्म कृती नियोजन केले आहे.

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या अनुषंगाने गुरूवार दि.२१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची बैठक पार पडली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर डेरे, डीन डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते सन १९९५ पासून सातत्याने पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आल्यामुळे १३ जानेवारी २०११ नंतर भारतात एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही. यामुळे मार्च २०१४ मध्ये भारताला पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

यावर्षीच्या मोहिमेसाठी जिल्ह्यात ग्रामीण, शहरी व महानगरपालिका क्षेत्र मिळून एकूण ४ लाख ७ हजार ९७८ बालकांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ३ हजार १५० बूथ उभारण्यात येणार असून २ हजार ९२६ आयपीपीआय टीम, ६४९ मोबाईल टीम व १३१ ट्रान्झिट टीम कार्यरत राहणार आहेत पोलिओ मोहिमेच्या दिवशी बूथवर लसीकरण करण्यात येणार असून त्यानंतर ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस घरोघरी जाऊन राहिलेल्या बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे.

पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देऊन जिल्हा पोलिओमुक्त ठेवण्यासाठी पालकांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे