पुणे दुर्घटनेनंतर जळगावात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई..
३९ हजार लिटर रसायन, १५२४ लिटर गावठी दारू जप्त

जळगाव : पुणे येथे गावठी दारूमुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवली.अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली २९ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत एकूण ६२ गुन्हे नोंदविण्यात आले असून ४१ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईदरम्यान आरोपींकडून ३९,०९५ लिटर रसायन तसेच १,५२४ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १६ लाख ८२ हजार ९०५ रुपये इतकी असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.
ही विशेष मोहीम जळगाव तालुक्यातील देवुळवाडे, शेळगाव, सिरसोली तसेच भुसावळ तालुक्यातील शिवपूर, कनहाळे, कनहाळे (खुर्द), चोपडा तालुक्यातील नांदेड, उतराण आणि खारपाडा परिसरात राबविण्यात आली.
कारवाई यशस्वी करण्यासाठी निरीक्षक अशोक तारू (भरारी पथक, जळगाव), निरीक्षक चकोर (जळगाव), निरीक्षक रमेश राठोड (भुसावळ), निरीक्षक किशोर गायकवाड (चाळीसगाव) तसेच चोपडा विभागाचे निरीक्षक व त्यांच्या पथकांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध दारू निर्मिती, वाहतूक अथवा विक्रीबाबत कोणतीही माहिती किंवा तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३९९९९ तसेच व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधावा.