भुसावळ

अटक टाळण्यासाठी २० हजाराची लाच : PSI सह खाजगी पंटर वर ACB कडून गुन्हा दाखल..

जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात अटक न करता केवळ ‘चॅप्टर केस’ करून प्रकरण मिटवण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आणि त्याच्या खाजगी मध्यस्थाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात खाजगी इसमाला ताब्यात घेण्यात आले असून आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार झाला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे राजू सांगळे (पोलीस उपनिरीक्षक, वर्ग-२, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे) आणि सलीम हकीम कुरेशी (वय ४६, रा. बोदवड) अशी आहेत.

तक्रारदार आणि त्यांच्या मित्राचे २८ मार्च २०२६ रोजी भुसावळ येथील खडका चौफुली परिसरात पैशांच्या व्यवहारातून एका व्यक्तीसोबत किरकोळ भांडण झाले होते. या घटनेनंतर तक्रारदार व त्यांच्या मित्राविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात अटक होऊ नये आणि केवळ चॅप्टर केस करून प्रकरण निकाली काढण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच द्यावी लागेल, अशी मागणी PSI राजू सांगळे यांनी तक्रारदाराच्या पत्नीकडे केल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ७ एप्रिल २०२६ रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली.तक्रारीनंतर ACB पथकाने पंचांसमक्ष मागणीची पडताळणी केली. तपासादरम्यान खाजगी इसम सलीम कुरेशी याने तक्रारदाराला अटक टाळण्यासाठी PSI सांगळे यांच्या वतीने ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर तक्रारदाराने PSI राजू सांगळे यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता, त्यांनी तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवून ती रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे ACB च्या तपासात समोर आले.

लाचेची मागणी आणि संमती निष्पन्न झाल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईनंतर आरोपी PSI राजू सांगळे फरार झाला असून ACB त्याचा शोध घेत आहे. तर सलीम कुरेशी याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ही कारवाई जळगाव ACB चे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, हेमंत नागरे, सुरेश पाटील, अमोल सूर्यवंशी, भूषण पाटील, राकेश दुसाने आणि प्रनेश ठाकूर यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे