शासनाच्या संच वाटप प्रक्रियेत KYC साठी 100 रुपयाची लाच : खाजगी महिला कर्मचाऱ्यावर ACB ची कारवाई..

जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वितरण प्रक्रियेत लाभार्थ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी खाजगी स्वरूपात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा कारवाई केली आहे.
या कारवाईत भाग्यश्री विजय पाटील महिला कर्मचारी यांना तक्रारदाराकडून १०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. तसेच घटनास्थळावरून एकूण २६ हजार ७७० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत अत्यावश्यक संच व सुरक्षा संच मिळण्यासाठी दि. ०३ जून २०२६ रोजी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानंतर दि. ०४ जून रोजी वावडदा (ता. जि. जळगाव) येथे संच स्वीकारण्यासाठी उपस्थित राहण्याचे पत्र प्राप्त झाले होते. तक्रारदार संच घेण्यासाठी केंद्रावर गेले असता संबंधित महिला कर्मचाऱ्याने केवायसी प्रक्रियेसाठी दोन फॉर्म खरेदी करावे लागतील असे सांगून १०० रुपयांची मागणी केली. मात्र अर्जावरील स्पष्ट सूचनेनुसार लाभार्थ्यांना संच पूर्णपणे विनामूल्य देण्यात येत असून कोणत्याही प्रकारची रक्कम मागितल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे नमूद होते.
यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. पडताळणीत आरोपी महिलेने पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला.
कारवाईदरम्यान महिला कर्मचारी यांनी तक्रारदाराकडून १०० रुपये स्वीकारले. तसेच घटनास्थळी असलेल्या झेरॉक्स मशीनजवळील स्टीलच्या डब्यातून आणि इतर ठिकाणांहून मिळून २६,७७० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही रक्कम लाभार्थ्यांकडून केवायसीच्या नावाखाली घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे (ला.प्र.वि. नंदुरबार कॅम्प जळगाव), श्रेणी पोउप निरीक्षक सुरेश पाटील, पोहेकों बाळू मराठे व पोकों राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.