जळगाव

पावसाळ्यापूर्वी रस्ते व गटारींची कामे पूर्ण करा; अन्यथा जबाबदारी निश्चित होईल – उपमहापौर मनोज चौधरी

जळगाव –  शहरातील रस्ते, गटारी, जलनिस्सारण व्यवस्था आणि पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी महानगरपालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. यावेळी विकासकामांच्या गतीबाबत नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत जाब विचारण्यात आला.

बैठकीत शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था अद्यापही दयनीय असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना खड्डेमुक्ती, गटार सफाई आणि जलनिस्सारणाच्या कामांमध्ये अपेक्षित वेग नसल्याबद्दल उपमहापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी रस्त्यांची सद्यस्थिती, निकृष्ट दर्जाच्या कामांवर झालेली कारवाई, पाणी साचणाऱ्या भागांवरील उपाययोजना, प्रलंबित विकासकामे, निधी खर्चाचा तपशील, नागरिकांच्या तक्रारी आणि आपत्कालीन यंत्रणेच्या तयारीबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती मागवण्यात आली.बैठकीत सर्वाधिक लक्षवेधी मुद्दा म्हणजे रस्ते दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या सुमारे २१ लाख रुपयांच्या डांबर, खडी व इतर साहित्य खरेदीचा होता. उपमहापौरांनी प्रश्न उपस्थित करत सांगितले की, ही प्रक्रिया दोन महिने आधी पूर्ण होणे अपेक्षित होते. पावसाळा तोंडावर आल्यावर साहित्य खरेदी करून कामे केल्यास दर्जा आणि परिणामकारकतेवर प्रश्न निर्माण होऊ शकतात. आगामी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मेहरूण परिसरातील गटारीचे पाणी रस्त्यावर येण्याचा गंभीर प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला. मेहरूण भागातील सांडपाणी रस्त्यावर येण्याची समस्या तातडीने सोडवून गणेश विसर्जनपूर्वी संबंधित कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच दरवर्षी पाणी साचणाऱ्या भागांची स्वतंत्र यादी तयार करून कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आले. विविध विभागांच्या खोदकामामुळे खराब झालेल्या रस्त्यांबाबत संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करण्याच्याही सूचना करण्यात आल्या.यावेळी उपमहापौर मनोज चौधरी यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “नियोजनातील हलगर्जीपणा आणि कामातील विलंब यापुढे खपवून घेतला जाणार नाही. जळगावकरांना खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ गटारी आणि सुरळीत जलनिस्सारण व्यवस्था मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.”

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे